Monday, March 28, 2011

एक रात्र सोबत


रात्र मला पहिल्यापासून आवडते किंवा तिचं माझं सतत एक हितगूज चालू असतं. लिहायला हा विषय निवडायचं कारण म्हणजे काल रात्री सोबत कुणी नव्हतं. अभ्यासाचा कंटाळा आला होता आणि एका सतत बॉसिंग करणाऱ्या प्रोजेक्ट मेंटॉरच्या हॅरॅसिंगला कंटाळून आलेलं मळभ घालवण्यासाठी म्हटलं चला फिरायलाच जाऊयात. रात्रीचे साडेअकरा झाले होते, औरंगाबादचा सिडको एरिया वर्दळ आटोपून झोपला होता. हॉस्टेलवाले तुरळक बॅचलर्स दोन-चार ठिकाणी उभे होते. आमच्या खासगी  हॉस्टेलचा वार्डेन खाली त्याची झोपायची तयारी करत होता. गेट लावून बाहेर पडलो.नाक्यावरती एक मुस्लिम टोळी सलमानचा कुठला तरी शो आयपॉडवर बघत एका मोडक्या हातगाडीवर बसलेली. तिथेच एका टपरीवर आणखी एक टोळकं पण इंजीनिअरींग कॉलेजचं त्यांच्या बेफिकीरी धुरात उडवत बसलेलं. 
रस्त्यावर ठिप्प शांतता. आभाळात आज चंद्र लटकला होता. दोन दिवसांनी होळी पौर्णिमा. गार वारा सुटला होता. मधूनच जाणारी एकाददुसरी गाडी वा ट्र्क. 
         औरंगाबादमध्ये कितिही म्हटलं तरी रस्त्यांशी सलगी करणं मला तरी जमत नाही, इतके ते अस्वच्छ,गलिच्छ असतात. पण तरीही आज गरज पडली होती. 
         पूर्वी कोपरगांवला असताना आम्ही रात्री संजीवनीला फिरायला जायचो. रात्र उन्हाळ्याची. रात्री हवेत वाऱ्याचा तो वेग कापत उतारावर आम्ही गाडी सोडायचो. तो उन्हाळी गारवा तेव्हाची ती उन्हाळी रात्र आणि सगळं भारलेलं वाटावं इतपत. 
         वाटेत एक चौक लागतो. तो अजुन्ही जागाच होता. ऊसाच्या रसवंतीवर चरखा चालू होता. न्यू बेकर्सला अजून गिऱ्हाईक दिसत होतं, एक दारुचं दुकान मंद दिवे लावून चालू होतं आणि बाकी चार दोन पानाची खोकी भटक्या कुत्र्यांसारखी पेंगुळली तरी अजून फ्रेश आहोत अशी दाखवत किंवा गिऱ्हाईकाच्या आशेने आशाळभूत तेवढी जागी. 
          थेट पुढचे रस्ते पालथे घातले.स्ट्रीटलाईटस कार्पोरेशनवरच्या शहराच्या उपकारांची परतफेड करतो आहोत असं दाखवत ऊभ्या होत्या.रस्त्याचा कंटाळा येऊ लागला की त्यावरची माणसं पाहू लागवं. त्यांचे चेहरे निरखले की आपलाही श्वास सुधारू लागतो. आणी रात्री तर बघावच एकदा.मग तो ऊशीरा घरी परतणारा दमलेला पांढरपेशा असतो किंवा बिनधास्त पण आतून संवेदणारा बॅचलर, कधी कधी एखादी वेश्या तिच्या पोटासाठी किंवा मग झोपण्यासाठी जागा शोधणारा पथारी घेऊन फिरणारा भिकारी, त्यातंच थकलेला दुकानदार वा तशात ऊत्साहाने चहा बनविणारा चायवाला. एवढ्यावरच न थांबता माणसं संपली की झाडं पाहू लागावं. त्या शांत हवेत हलणारी तरूवरं बघत राहावित.अशी रांग. दिवसभराच्या धुळीत माखलेली अंगं घेऊन नित्य उभी. त्यात संकल्पाची झाक आहे. त्यात गंभीरता आहे. त्यात कंटाळासुद्धा दिसून येतो. रात्र पुढे सरकू लागते. 
           माझ्या मॅडमचा एक मुलगा होता.इंजीनिअरींगला वालचंद कॉलेज, सांगलीला. तो आणि त्याचे  मित्र,त्या सांगत रात्री दोनला उठून चहा प्यायला जात. चहावाला झोपला असेल तर त्याला उठवत असत. 
           सांगलीला बंद झाला. कर्फ्यू लावला होता. लोक तीन दिवस घरात.आम्ही जाम वैतागलो. तेव्हा कर्फ्यू उठवण्याच्या आदल्या दिवशी रात्री अस्मादिक रात्री एकला उठून त्या सामसुम रस्त्यावर फिरून आलो.माणसांची त्यालाही सवय. त्या रात्री त्याचं तसं निराश-उदास रूपही पाहीलं. 
            पुण्याच्या रात्री,ओळीत उभ्या असणाऱ्या पी. एम. टी. बस, दगडूशेठसमोरचा रस्ता, त्यातच पाऊस असेल तर पाण्यात चमचमणारं त्या रोषणाईचं बिंब,घर आवरून झोपल्यासारखी वाटणारी तुळशी बाग, रात्री बराच वेळ जागे असणारे बुधवारातले 'ठराविक' रस्ते, टिळकांच्या आठवणी जाग्या व्हाव्यात असंच वातावरण आणणारी रात्रीची टिळक मंडई आणि अथक  जागं-पण पेंगूळणारं शिवाजीनगर-स्वारगेट,अशा कितीतरी जागांनी निद्रावश होते. 
           रात्र मला आवडते. कारण दिवसापेक्षा ती अधीक माझी वाटते.असो आता बराच वेळ होत आला. मी पायांना हॉस्टेलकडे वळण्याची आज्ञा देतो. थोड्यावेळात पहाट होईल. उगाच पक्ष्यांची झोपमोड नको. बहूत काय?

Monday, March 14, 2011

नित्यजन्म

     पाऊस चालू असताना ज्या विजा होतात त्या पहायला मला फार आवडतं.होस्टेलच्या खिडकीतून दिसणाऱ्या वीजा,सुईई आवाजात वाहणारा वारा, कडकडाट-गडगडाट इ. सर्वच गोष्टी मनसोक्त अनुभ- वताना,अनेक चांगल्या-चांगल्या आणि सुखद आठवणी काढायला छान वाटतं.
      होस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून दिसणारा झगमगाट जो आकाशात आसमंतीय पसरलेला असतो, मध्येच आभाळाचे दोन भाग केल्यासारखी चिरत जाणारी निळी-तांबडी वीज, तावदानं थरथरवणारा गडगडगडाट, रात्रीवर अशाकाळी पसरणारी सामसूम, खोलीतला एक एकाकी रुम पार्टनर, आणि हे सारं 'उगे' पाहावं तसं पाहणारा अस्मादिक! पावसाच्या टपटपण्यात जाणवू लागतात झाकिरजींचे हात किंवा आभाळावर वीजांच्या ड्र्मस्टीक्स आणि सूक्ष्मजीवांच्या बलीदानाने निर्माण होणारा मृदगंध...
       हे अनुभवण्याची गरज असते. खिडकीच्या गजांवर पाणीथेंब खोळंबले की मग टपटपणारे अजातबिंदू. वाऱ्याची हलकीच झुळूक येऊन अंगावर येणारे जलकण ते वाऱ्याच्या झोताने चिंब करणारे शींतोडे.
पाऊस असा मग मला हळवा करीत नाही. उदासीन दृष्टीने तो पाहण्यात वेळ निघतो आणि त्यालाही वाटतं कुणीतरी शेतकरी सोडून आपल्याला महत्व देणारं आहे.पथदिपांचा प्रकाश,तसा संपूर्ण शहराचा प्रकाश त्यात ओला होतो. रस्ते पेंगळू लागतात. अरे! पावसातंच झोपायचंय पाखरांना आज. 
पुन्हा एकदा मृदगंध फळफळतो. रात्रीमध्ये दिवस समरसू लागतो. ती फक्त-फक्त रात्र असते. दूर बुद्धाच्या डोंगरावर एक दिवा तेवढा फाकत असतो. रस्ते वाहू लागतात ते पाण्याने!
असा पाऊस चित्रकाराने चित्र पूर्ण केल्यासारखा एकसारखा कोसळू लागतो.ऊन्हाळयातला पहिला पाऊस. हल्ली लवकर येतो. माझ्यातलं मुल जागं करतो.तो आता पडू लागलाय. अशात मला कॉफी-चहाचा मग हवासा नाही वाटत किंवा कुणाचीतरी सोबत वगैरे.आपण आपलीच किती मोठी सोबत असतो नाही का? सुधीर मोघे त्यांच्या आधार कवितेत म्हणतात तसं-

जगण्यासाठी आधाराची खरंच गरज असते का?
आपण ज्याला आधार मानतो, तो खरोखर आधार असतो का? 
....
अखेर आधार ह्या शब्दाचाच आपण आधार घेत असतो का?




असो विषय भलतीकडे नको वळू देत,.
कदाचित पाऊस त्यासाठीच येत/आला असावातरीसुद्धा. भर ऊन्हानंतर... मारवा संध्याकाळी ऐकावा. तसा पावसाचा मल्हार असा रात्रीच्या जन्मावर अनुभवावा.
गुडुप पांघरुणात पावसाची आठवण...
तो पडतोय. त्याला कळतं माझ्या मनातलं... तो चिरकाल आहे.माझ्यासारखाच...
...बहूत काय?