Wednesday, August 10, 2011

नेमकं काय?

सुप्रभात की...
बऱ्याच दिवसांनी ब्लॉगवर लिहायला घेतोय. बरय प्रत्येकवेळी ब्लॉगची पाटी कोरी असते... तिला वेगळ्या भिजवलेल्या बोळ्याची गरज लागत नाही! हं... भिजवलेला बोळ्याची आठ्वण काढताच मन शाळेच्या दिवसात गेलं ना?? पाटी, तिच्यावरचा गृहपाठ पुसला जाउ नये, म्हणून केलेला आटापिटा, पेन्सिल, मधूनच कुरतडून खाता ती चव हवीशी वाटणं, बरच काही...एनीवे...
पुन्हा काय टाकायचं... या विचारात आम्ही पडलो आणि वाटलं.....

‌सांगतो..!

तेच सांगतो...

वाटलं देवा... देवा जग तू कां निर्माण केलस...? बर तयार वगैरे केलस आणि असं का बनवलस?
 बर असं म्हणजे अस्थिर, दंगे-धोपे माजवणारं, भ्रष्टाचारी कां बनवलंस?
देवा तू बनवलंस! देवा तू का बनवलंस,आम्हाला?... देवा आम्ही का बनवलं तुला?!(हे वाक्य दोन ते तीन अर्थांनी, वेगवेगळ्या लोकांकरीता.. ‍ ज्याला जे हवं ते घ्यावं)...तर हे...
अमेरीका मंद झाली न झाली तो इंग्लंड पेटला, तेवढ्यात लोकपाल लीला चालू झाल्या, इतक्यात पवनेचं पाणी पेटलं, त्याआधी इजिप्तचा इश्शू... मग चीनचा...
गरज कुणाची कुणाला? माणसांवरच माणूस जगतो. अवलंबून असतो. राहतो... तरी या अजब प्रकारांनी मी त्रस्त होतो. अरे हे चाललंय काय? डोळेझाक करायची?? मग... प्रतिक्रिया कट्ट्यावर, वाचकांच्या पत्रव्यवहारात द्यायच्या?... फक्त..!?..
काल रात्री अब्राहम लिंकनचं मुलाला लिहिलेलं पत्र सारखं वाचून काढलं.अस्वस्थ झालो की दुसरा पर्याय नसतो तेवढ्या पत्राशिवाय...
असो की! या लिहिण्यामुळं थोडं मन हलकं होईल असं वाटतं आणि कळत-नकळत, वा जाणून-बुजून ते रिकामं करतो असच काही पुन्हा नव्याने भरण्यासाठी...

अखेर इतिहास स्वतःच घडत असतो‌.आपल्यासोबत आपणच... तो पुन्हा पुन्हा त्याच पद्धतीने घडतो. नाविन्य इतकच की त्याचा चेहरा वेगळा असतो आणिक मोहरा बदललाय असं फक्त वाटत राहतं...
या साऱ्यांचा विचार अतिंद्रिय वगैरे वाटू लागला की एकच करावं... एक पाटी मार्केटमधून घ्यावी. पेन्सिल घ्यावी आणि बालपण आठवण्यापेक्षाही बाराखडी परत पुन्हा लिहू लागावं...

क्रमशः

Sunday, April 17, 2011

मन चालत-चालत





आता लिहून-लिहून काय लिहायचं.... असं जेव्हा वाटतं... तेव्हा काहीतरी लिहूचयात असं ठरवून वगैरे लिहायचं म्हणजे बऱ्याच आठ्वणी येणार, त्यांना सावरावं-आवरावं लागणार, घरकोंबड्या- पणातून बाहेर यावं लागणार, सुट्टीच्या दिवशी अंथरूणातून लवकर उठावं लागणार,हवी ती माणसं नको त्यावेळी आठवावी लागणार आणि नको ती माणसं ...जाऊ दे ना...
       नमनाला घडाभर तेलात उरकतोय कि काय हा! वाटत असेलच!
            पण सध्या मलाही कुठला विषय घ्यावा हा प्रश्न पडला असेल तरी तो ब्रह्मप्रश्न नाहीय यातच नवीन विषय मिळेल लिहायला याचं मूळ सापडतंय. 
कॉलेजमुळे आलेलं मळभ घालवण्यासाठी तुम्ही लोक काय करता? भलतंच काय विचारतोय? माझं म्हणाल तर पोस्टग्रॅज्युएशन करत असूनसुद्धा पकल्यासारखं वाटू लागतं. बरं औरंगाबादमध्ये या ऊन्हाळयात कुठं फिरायला जावं तर तेही करता येईना, म्हणून विचारतोय…! भारत-ऑस्ट्रेलिया मॅच चालू आहे.
आभाळात नेहमीसारखेच पक्षी परतण्याची वेळ होऊन गेली आहे. मैदानावरून सुर्यास्त अप्रतिम दिसतो. आधीपासून असलेली आणि लावलेलीही झाडं रवंथ करणाऱ्या जनांवरांसारखी शांतपणे उभी आहेत. कँटीनवर आज तशी तुरळक गर्दी आहे. भर ऊन्हानंतर सुटणाऱ्या सायंवाऱ्याची सोबत आणि सोबत लतादीदी गातायत. मध्येच मला "घनतमी..." ऐकण्याची लहर येते. भारत-ऑस्ट्रेलिया मॅच पुढे सरकते आहे. 
 हॉस्टेलमध्ये टिव्हीसमोर पूर्वी रामायण बघायला गर्दी व्हायची तसं इथं वातावरण आहे. आज नाथषष्ठीची सुट्टी दिलेली होती. माझ्या भोवती भाराभर असाईनमेंटसचा पसारा पडला आहे.माझ्या रुमच्या खिडकीतून दिसणारी उत्तरसांज किंवा ऊशीरसांज कॅनव्हासवर चितारलेल्या निसर्गचित्रासारखी दिसते, हे तुम्हाला माहीत आहेच.गेटकिपर पेंगळून थकून बसला आहे. माझी कल्पना तो सिगारेट  कां पीत नाही, तंबाखू खाताना तो दिसत नाही... वाटेत मुलींचं हॉस्टेल लागतं.परत भरपूर झाडं...गुलमोहर, शेवरी, सुबाभूळ... कट्ट्यावर एक जोडपं  बसलंय. ती त्याला विचारत असेल ,'वर्ष संपत आलं.. मग फायनल एक्झाम.' त्यातला अर्थ त्याच्या उशीरा लक्ष्यात आला असेल कां? तो फक्त 'हं' एवढंच बोलेल. अंधार वेगाने सांडू लागतो. माझी आणखी एक फेरी पूर्णहोत येते. मध्येच ढग गरजतात. त्यांनाही कशाचीतरी गरज आहेच.वर्कशॉपमधून आणखी वेगाने वेल्डिंगचे आवाज येऊ लागतात. मी दूर जाता जाता ते कमी-कमी होत जातात. आयुष्यातल्या दुःखांनासुद्धा डॉपलर इफेक्ट लागू होतो. काश त्याच्या आपल्यातलं अंतर मोजता आलं असतं. टाळून गेलो असतो.
रस्त्यावर गर्दी वाढल्यासारखी वाटते. रोज लाखो लग्नं होत असतील भारतात.जपानमध्ये आत्ता काय चालू असेल बरं? नवीन काही बातमी. बघायला पाहीजे. चार दिवस झाले निवांतपणे पेपर असा वाचलेला नाहीए.मुली एवढ्या टाईट जिन्स घालू कशा शकतात किंवा कां घालतात? असा मनात खेडूत प्रश्न अनाहूत येतो.
इस्त्रीवाला नमस्कार साहेब म्हणतो.अजाणची बांग ऐकू येते. बुद्धविहारातून  मंत्रघोष आणि शीवमंदीरात नागाची स्तुती... माणसांच्या कोलाहलातून माझे आवाज स्पष्टऐकू येऊ लागतात. देव नावाच्या अस्थित्वावर माझा आणि इतरांचा आत्मा स्थैर्य असतो.देव नसता तरी तो स्थिरच असता पण मग इतरांबद्दल  खात्रीने सांगता आलं नसतं.भारत-ऑस्ट्रेलिया मॅच चालू आहे.
अनेक चित्कार येतात. दिवसातून आज किती आवाज  आले असतील. किती बाहेर पडले असतील.किती आत दबले असतील. रतन टाटांचं वाक्य ," The most  Noise usually comes from people who have the most to hide" मी दचकतो मग हसतो.हसतो म्हणजे सुखात आहे 'दाखवण्यासाठीच'.कुरुप असली तरी माझी दाखवण्याची आणि खाण्याची बत्तीशी एकच आहे.त्यातल्या त्यात बरे आहे. लोकांशी बोलायचा म्हणुनच मी प्रयत्न करीत नाही.कारण ते फक्त दुःखालाच शोधू लागतात. पण ऐकू नाही शकत. त्यांना आनंद हवा असतो.
कारण आजवरच्या सगळ्या ओव्या, ग्रंथ हे दःखावरच वसलेले असतात.त्या वाचून त्यांना कंटाळा येतो. ते एखाद्या चार्ली चॅप्लीनची वाट बघू लागतात. जणू कृष्णजन्मासारखी. हे मध्येच काय आलं. मी डावीकडे एक वळण घेतो.दोन्ही उंच इमारती अंगावर येतात.
मन मोकळं केल्याशिवाय एकाग्रता कशी लाभणार! हे शाओलीनचं तत्त्वज्ञान. आपलं मोकळंमन आपणच भरत राहतो.ते जास्तीत जास्त मधाचं मोहोळ बनवण्याचा प्रयत्न करावा. शेवटी मोकळं करण्याची वेळ येताच मधच बाहेर येईल.आणि कुणी दुसऱ्याने केला तरी.भारत-ऑस्ट्रेलिया मॅच संपत आली आहे. भारताने मॅच जिंकलीसुद्धा.कि ऑस्ट्रेलिया हरली असं म्हणू.काहीही म्हणा पण भारताला 'सरप्राईजेस' देण्याचीसवय आहे. नाही कां?... After all India is a Funny Country! या विचारांना लगाम नसतो आणि विचार घोडे नसतात. त्यांच्यालहरींइतकाच मीही लहरी बनतो. उद्या लवकर उठावं लागणार. वर्क प्रेझेंटेशची तयारी बाकी आहे.बहूत काय?
                   

Tuesday, April 5, 2011

तेच पण वेगळं...

         
    
    नेहमीप्रमाणे सगळीकडची दिनचर्या सुरू झाली होत. मी नित्यकर्मे आटोपून गच्चीत गेलो आणि आज काही खास दिवस असल्याचे सतत वाटू लागलं.
           सगळंच जिथल्या तिथे आहे. रोजच्या मार्गवरून नेमून दिल्यासारखा मार्गक्रमणा करणारा सूर्य, आजुबाजूच्या इमारती, त्यावर तशीच थोडी सावली थोडी किरणे पडली आहेत.मग?रोजच्यासारखी खायला ठेवायला आलोय  असे वाटून चिमण्या, बुलबुल दुकान कधी उघडतो अशा अवस्थेत ग्राहक जसे बसतात तशा फांद्या फांद्यावर आल्या आहेत.इकडून-तिकडून भांड्यांचे, आंघोळीचे आवाज येतायत.सगळ्यांची लगबग चालू आहे
           गाड्यांचे खटारे पळतायत. दूरवरच्या रेल्वे ट्रॅकपाशी खंड्याचा ठणठणपाळ पण सुरेखसूरात ऐकू येतोय. उन्हं वर चढतात. थोड्या वेळात सारं मध्यावर येईल. मग आज वेगळं काय वाटतं?
            ....आणि संकटाच्या दरीतून कुणी वरती यावा, कुंद नभातून सूर्य वा इंद्र्धनुष्यडोकवावा, मोर फर्रऽदिशी पिसारा फूलवून म्यॉऽ करावा, हवीहवीशी वाटणारी मुलगी अचानकसमोर यावी किंवा तोच तिच्या घरी दाखल व्हावा. तसं होताना जे वाटतं त्याचसाधर्म्याने उत्तर मिळालं. कदाचीत आज माझ्याच बघण्याची द्दृष्टी बदलली होती की काय?!

-रोहन

Monday, March 28, 2011

एक रात्र सोबत


रात्र मला पहिल्यापासून आवडते किंवा तिचं माझं सतत एक हितगूज चालू असतं. लिहायला हा विषय निवडायचं कारण म्हणजे काल रात्री सोबत कुणी नव्हतं. अभ्यासाचा कंटाळा आला होता आणि एका सतत बॉसिंग करणाऱ्या प्रोजेक्ट मेंटॉरच्या हॅरॅसिंगला कंटाळून आलेलं मळभ घालवण्यासाठी म्हटलं चला फिरायलाच जाऊयात. रात्रीचे साडेअकरा झाले होते, औरंगाबादचा सिडको एरिया वर्दळ आटोपून झोपला होता. हॉस्टेलवाले तुरळक बॅचलर्स दोन-चार ठिकाणी उभे होते. आमच्या खासगी  हॉस्टेलचा वार्डेन खाली त्याची झोपायची तयारी करत होता. गेट लावून बाहेर पडलो.नाक्यावरती एक मुस्लिम टोळी सलमानचा कुठला तरी शो आयपॉडवर बघत एका मोडक्या हातगाडीवर बसलेली. तिथेच एका टपरीवर आणखी एक टोळकं पण इंजीनिअरींग कॉलेजचं त्यांच्या बेफिकीरी धुरात उडवत बसलेलं. 
रस्त्यावर ठिप्प शांतता. आभाळात आज चंद्र लटकला होता. दोन दिवसांनी होळी पौर्णिमा. गार वारा सुटला होता. मधूनच जाणारी एकाददुसरी गाडी वा ट्र्क. 
         औरंगाबादमध्ये कितिही म्हटलं तरी रस्त्यांशी सलगी करणं मला तरी जमत नाही, इतके ते अस्वच्छ,गलिच्छ असतात. पण तरीही आज गरज पडली होती. 
         पूर्वी कोपरगांवला असताना आम्ही रात्री संजीवनीला फिरायला जायचो. रात्र उन्हाळ्याची. रात्री हवेत वाऱ्याचा तो वेग कापत उतारावर आम्ही गाडी सोडायचो. तो उन्हाळी गारवा तेव्हाची ती उन्हाळी रात्र आणि सगळं भारलेलं वाटावं इतपत. 
         वाटेत एक चौक लागतो. तो अजुन्ही जागाच होता. ऊसाच्या रसवंतीवर चरखा चालू होता. न्यू बेकर्सला अजून गिऱ्हाईक दिसत होतं, एक दारुचं दुकान मंद दिवे लावून चालू होतं आणि बाकी चार दोन पानाची खोकी भटक्या कुत्र्यांसारखी पेंगुळली तरी अजून फ्रेश आहोत अशी दाखवत किंवा गिऱ्हाईकाच्या आशेने आशाळभूत तेवढी जागी. 
          थेट पुढचे रस्ते पालथे घातले.स्ट्रीटलाईटस कार्पोरेशनवरच्या शहराच्या उपकारांची परतफेड करतो आहोत असं दाखवत ऊभ्या होत्या.रस्त्याचा कंटाळा येऊ लागला की त्यावरची माणसं पाहू लागवं. त्यांचे चेहरे निरखले की आपलाही श्वास सुधारू लागतो. आणी रात्री तर बघावच एकदा.मग तो ऊशीरा घरी परतणारा दमलेला पांढरपेशा असतो किंवा बिनधास्त पण आतून संवेदणारा बॅचलर, कधी कधी एखादी वेश्या तिच्या पोटासाठी किंवा मग झोपण्यासाठी जागा शोधणारा पथारी घेऊन फिरणारा भिकारी, त्यातंच थकलेला दुकानदार वा तशात ऊत्साहाने चहा बनविणारा चायवाला. एवढ्यावरच न थांबता माणसं संपली की झाडं पाहू लागावं. त्या शांत हवेत हलणारी तरूवरं बघत राहावित.अशी रांग. दिवसभराच्या धुळीत माखलेली अंगं घेऊन नित्य उभी. त्यात संकल्पाची झाक आहे. त्यात गंभीरता आहे. त्यात कंटाळासुद्धा दिसून येतो. रात्र पुढे सरकू लागते. 
           माझ्या मॅडमचा एक मुलगा होता.इंजीनिअरींगला वालचंद कॉलेज, सांगलीला. तो आणि त्याचे  मित्र,त्या सांगत रात्री दोनला उठून चहा प्यायला जात. चहावाला झोपला असेल तर त्याला उठवत असत. 
           सांगलीला बंद झाला. कर्फ्यू लावला होता. लोक तीन दिवस घरात.आम्ही जाम वैतागलो. तेव्हा कर्फ्यू उठवण्याच्या आदल्या दिवशी रात्री अस्मादिक रात्री एकला उठून त्या सामसुम रस्त्यावर फिरून आलो.माणसांची त्यालाही सवय. त्या रात्री त्याचं तसं निराश-उदास रूपही पाहीलं. 
            पुण्याच्या रात्री,ओळीत उभ्या असणाऱ्या पी. एम. टी. बस, दगडूशेठसमोरचा रस्ता, त्यातच पाऊस असेल तर पाण्यात चमचमणारं त्या रोषणाईचं बिंब,घर आवरून झोपल्यासारखी वाटणारी तुळशी बाग, रात्री बराच वेळ जागे असणारे बुधवारातले 'ठराविक' रस्ते, टिळकांच्या आठवणी जाग्या व्हाव्यात असंच वातावरण आणणारी रात्रीची टिळक मंडई आणि अथक  जागं-पण पेंगूळणारं शिवाजीनगर-स्वारगेट,अशा कितीतरी जागांनी निद्रावश होते. 
           रात्र मला आवडते. कारण दिवसापेक्षा ती अधीक माझी वाटते.असो आता बराच वेळ होत आला. मी पायांना हॉस्टेलकडे वळण्याची आज्ञा देतो. थोड्यावेळात पहाट होईल. उगाच पक्ष्यांची झोपमोड नको. बहूत काय?

Monday, March 14, 2011

नित्यजन्म

     पाऊस चालू असताना ज्या विजा होतात त्या पहायला मला फार आवडतं.होस्टेलच्या खिडकीतून दिसणाऱ्या वीजा,सुईई आवाजात वाहणारा वारा, कडकडाट-गडगडाट इ. सर्वच गोष्टी मनसोक्त अनुभ- वताना,अनेक चांगल्या-चांगल्या आणि सुखद आठवणी काढायला छान वाटतं.
      होस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून दिसणारा झगमगाट जो आकाशात आसमंतीय पसरलेला असतो, मध्येच आभाळाचे दोन भाग केल्यासारखी चिरत जाणारी निळी-तांबडी वीज, तावदानं थरथरवणारा गडगडगडाट, रात्रीवर अशाकाळी पसरणारी सामसूम, खोलीतला एक एकाकी रुम पार्टनर, आणि हे सारं 'उगे' पाहावं तसं पाहणारा अस्मादिक! पावसाच्या टपटपण्यात जाणवू लागतात झाकिरजींचे हात किंवा आभाळावर वीजांच्या ड्र्मस्टीक्स आणि सूक्ष्मजीवांच्या बलीदानाने निर्माण होणारा मृदगंध...
       हे अनुभवण्याची गरज असते. खिडकीच्या गजांवर पाणीथेंब खोळंबले की मग टपटपणारे अजातबिंदू. वाऱ्याची हलकीच झुळूक येऊन अंगावर येणारे जलकण ते वाऱ्याच्या झोताने चिंब करणारे शींतोडे.
पाऊस असा मग मला हळवा करीत नाही. उदासीन दृष्टीने तो पाहण्यात वेळ निघतो आणि त्यालाही वाटतं कुणीतरी शेतकरी सोडून आपल्याला महत्व देणारं आहे.पथदिपांचा प्रकाश,तसा संपूर्ण शहराचा प्रकाश त्यात ओला होतो. रस्ते पेंगळू लागतात. अरे! पावसातंच झोपायचंय पाखरांना आज. 
पुन्हा एकदा मृदगंध फळफळतो. रात्रीमध्ये दिवस समरसू लागतो. ती फक्त-फक्त रात्र असते. दूर बुद्धाच्या डोंगरावर एक दिवा तेवढा फाकत असतो. रस्ते वाहू लागतात ते पाण्याने!
असा पाऊस चित्रकाराने चित्र पूर्ण केल्यासारखा एकसारखा कोसळू लागतो.ऊन्हाळयातला पहिला पाऊस. हल्ली लवकर येतो. माझ्यातलं मुल जागं करतो.तो आता पडू लागलाय. अशात मला कॉफी-चहाचा मग हवासा नाही वाटत किंवा कुणाचीतरी सोबत वगैरे.आपण आपलीच किती मोठी सोबत असतो नाही का? सुधीर मोघे त्यांच्या आधार कवितेत म्हणतात तसं-

जगण्यासाठी आधाराची खरंच गरज असते का?
आपण ज्याला आधार मानतो, तो खरोखर आधार असतो का? 
....
अखेर आधार ह्या शब्दाचाच आपण आधार घेत असतो का?




असो विषय भलतीकडे नको वळू देत,.
कदाचित पाऊस त्यासाठीच येत/आला असावातरीसुद्धा. भर ऊन्हानंतर... मारवा संध्याकाळी ऐकावा. तसा पावसाचा मल्हार असा रात्रीच्या जन्मावर अनुभवावा.
गुडुप पांघरुणात पावसाची आठवण...
तो पडतोय. त्याला कळतं माझ्या मनातलं... तो चिरकाल आहे.माझ्यासारखाच...
...बहूत काय?